माझ्या पूर्वजांचे आणि वाडवडिलांचे जीवन मानसिक गुलामीचे होते, पशूपेक्षाही हीन वागणुकीत गेलेले होते. त्या जीवनाला परिवर्तनाची दिशा देणारा एकच महामानव होता.
प्रज्ञासूर्य, महाकारुणिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वामुळे माझे, माझ्या कुटुंबाचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे जीवन बदलले.
आज माणूस म्हणून मिळालेली ओळख ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे.
त्यांच्या या उपकारांची जाणीव ठेवून, मी त्यांच्या कार्याचा शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहीन. त्यांनी सुरू केलेल्या माणुसकीच्या क्रांतीसाठी, चळवळीसाठी आणि मानवी मनाला उत्तुंग शिखरापर्यंत नेण्यासाठी,
आज मी भीम संकल्प घेत आहे की :
मी बौद्ध धर्माची दिक्षा घेईन आणि बुद्ध, धम्म, संघ ह्यांच्या शिकवणी प्रमाणे आचरण करेल.
मी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता स्थापन करण्यासाठी नेहेमी प्रयत्नशील राहील.
मी पंचशीलांचे पालन करीन—हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटे उच्चारण व कोणतेही व्यसन करणार नाही.
मी स्वाभिमानी, स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करेन.
मी माणसा माणसात भेद करणारी संस्कृती मानणार नाही.
बौद्ध झालेल्या सर्वांना मी आदराने सामावून घेईन; कोणताही भेद करणार नाही.
मी भारतीय संविधान, बुद्धाचा धम्म आणि २२ प्रतिज्ञा ह्याच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही.
मी आंबेडकरी बौद्ध समाजात द्वेष आणि भेद तयार होईल असे कोणतेही वक्तव्य आणि आचरण करणार नाही.
मी बाबासाहेबांचा आदेश मानून दर रविवारी सहकुटुंब बुद्ध विहारात जाईन.
मी जुने जातीव्यवस्था उघड करणारे आडनाव टाकून देऊन - बौद्ध धर्मास साजेसे आडनाव घेईन.
माझा वेळ, शरीर व बुद्धी समाजाच्या सम्यक उत्कर्षासाठी समर्पित करेन (फक्त पैसे देऊन नाही).
मी निस्वार्थी भावनेने आंबेडकरी बौद्ध समाजाच्या संस्था आणि चळवळीत सहभागी होईन.
मी "शिका, जागृत व्हा, संघटित व्हा, आत्मविश्वास ठेवा, कधीही हार मानू नका" ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या पंचसूत्री नुसार कार्य करेन.
मी आंबेडकरी बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वास्थ्य, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक या संकल्पना आणि संस्था एकमेकांवर अवलंबून आहेत, हे सत्य निःसंशयपणे स्वीकारतो / स्वीकारते.
मी आंबेडकरी बौद्ध समाज एक आदर्श समाज म्हणून स्थापन होईल ह्यासाठी प्रयत्नशील असेल; मी स्वतः आदर्श उदाहरण बनेन.
ह्या आदर्श समाजाचे अनुकरण इतर सर्व समाज करतील आणि नैतिक मूल्यांवर भारत बौद्धमय होईल अशी मला आशा वाटते.
मी वरील सर्व बाबींना पाळण्याचा भीम संकल्प करीत आहे असे मी स्वतःला वचन देत आहे.
माझे नाव :
माझी सही:
दिनांक:
दिनांक:
आंबेडकरी बौद्ध समाज मंच - Ambedkarite Buddhist Collaboration Platform,
पुणे, प्रथम आवृत्ती, डिसेंबर २०२५